छबीतला श्रीकृष्ण खुपच मोहक जाणवला.. चिंतनशिलतेकडे नेणारी ही छबी बरेच संवाद साधून गेली.. आमच्या संस्कारी मनावरचा श्रीकृष्ण मला नवीन काही सांगत होता..
श्रीकृष्ण... मानवी मनाचे स्वप्न.. संपन्नत्व शोधायचे असेल तर श्रीकृष्णाइतके त्रुप्त व्यक्तीमत्व दुसरे नसावे..श्रीकृष्णाला ईश्वरीय अवताराची झुल जरी पांघरली असली तरी त्यातले संपन्न पुरुषत्वच मनाला भावणारे आहे.. जन्माचा उद्येशच मुळात मनाला प्रसन्न ठेवणे असावा.. किंबहुना आम्ही धारण करावा असा धर्म म्हणजे "प्रसन्नत्व राखणे" एवढाच.. आता प्रसन्नत्व राखण्यासाठी काय करावे असा प्रश्न मनात आला तर त्याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे येथे प्रत्येक आत्म्याने श्रीकृष्ण होऊन जगावे..
जगातली सारी मुळ प्रश्नेच ही स्त्री मनाशी निगडित असावीत हे सत्य कदाचित श्रीकृष्णाला उमजलेले असावे.. पुरुषी अंहकाराच्या गर्तेत स्त्री मनांची होणारी कुचंबणा आणि त्यामुळे निर्माण होणारे नात्यातले तणाव हे प्रेमधर्मच विसरून वा प्रेम संकल्पनेची गल्लत करुन जगली जातात.. आणि यातुनच प्रश्नांचा प्रारंभ होतो.. या दुर्मीळ सत्याचे विस्मरण होण्याचा शाप मानव जातीला कोणी दिला असेल याची माहिती नाही.. पण शापमुक्ततेचे सहज मार्ग "श्रीकृष्ण" या ईशोमानवी आत्म्यातच आम्हाला सापडू शकतात...
जगणे म्हणजे युद्ध नव्हे.. जीवन संघर्ष जरूर आहे पण हा संघर्ष वैचारिक, वैज्ञानिक पातळीवरचा आहे.. त्याची उत्तरें प्रश्नाच्या गर्भातच अंकुरत असतात..
श्रीकृष्ण हा प्रश्नही आहे आणि उत्तरही आहे.. तो आत्म्याला आश्वस्त करतो.. आत्म्याचे अमरत्व तो विषद करतो.. आणि जे अमर आहे ते चिरंतन आनंद आहे.. किंबहुना अमरत्व हे आनंदाचे स्त्रोत आहे.. हा आनंद चरचरातला आहे.. तो निसर्गाच्या प्रत्येक अंशात आहे.. आणि हेच निसर्ग अंश हे स्त्रीतत्वाला आश्वासक असे बीज आहेत.. पुरुषांना हे ओळखता आले पाहिजे तरच त्याचा आस्वाद घेता येईल.. श्रीकृष्णाचे प्रसन्नत्व हे निसर्ग आणि स्त्रीत्वाच्या समन्वयात दडलेले असावे.. हे समन्वयत्व ज्या पुरुषाला उमजते तोच जगण्यातल्या आनंद पारखी असतो.. तो श्रीकृष्ण तत्वांचा पुरस्कर्ता असतो.. श्रीकृष्ण तत्वच मुळी जगण्यातले सुंदर शोधणारे आहे... नात्याच्या अवतरणात जगताना येणाऱ्या मर्यादे पलीकडील एक नाते असते ज्यात आत्मीकतेतले विराट शोधता येते.. हेच राधा तत्व.. राधा ही केवळ सखी नाहीच तर ती कालापारचे दिर्घकालीन सख्यत्व जगणारी आत्मीक साधना आहे... स्त्री तत्वाचे प्रतिनिधित्व करताना ती स्वतःच्या अस्तित्वाला विस्मरणात टाकत जगते.. राधेचे हे विस्मरणच श्रीकृष्णाच्या मनाला भावलेले स्मरण आहे.. हे स्मरणच श्रीकृष्णाचे बलस्थान असावे.. व्यवहारातल्या भुमिका आणि ही आत्मपातळीवर निसर्ग सानिध्याच्या साक्षीने जगायची स्त्रीपुरूषांनी जगायची अलौकिक तत्वें ही भिन्नच असतात किंवा त्यातील भिन्नता ओळखूनच स्त्रीपुरुषांनी ती जगली तरच श्रीकृष्ण उमजेल.. श्रीकृष्ण तत्वातले देवत्व हे स्त्री नाते जगता जगता उमलत जात असावे.. ते तत्क्षणी प्रसन्नेतले गुढ गहण सांगणारे नसतेच.. दूरपर्यंत जात जात ते जगावे आणि द्वैत सरुन अद्वैत जाणवु लागले की त्यातल्या ईश्वरीय स्पर्श अनुभूत होत आत्मसाक्ष होत जातात.... "श्रीकृष्ण राधा" ही प्रेमतत्वें लिंगभेदाला छेद देऊन एकात्मतेकडे नेणारे मार्गदर्शक आहेतद्व.. येथे केवळ आत्मीक आऩदाचा विचार आहे.. कारण आनंद हा प्रत्येक जीवाला मिळालेला जन्मसिध्द हक्क आहे आणि श्रीकृष्ण हे आनंदाचे दैवत आहे...
*कृष्णा..*
*अनुपस्थितीतूनही जाणीवेत*
*उतरणारा तू...*
*पुराव्याशिवाय मिरेला*
*आत्मसाक्ष झालेला तू...*
*निरंतर प्रवाही तरी,*
*कालींदीच्या डोहातला तू...*
*तुझा निश्चल विरह,*
*शांत कमलदलात बंदीस्त तू...*
*प्रकाश चिरंजीव तरीही*
*संध्याछायेचा शाश्वत विश्वास तू..*
*शब्दात गुंतवून खूप ठेवले*
*अर्थ राधेतला एकवार सांग तू...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
..........
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
Comments
Post a Comment