*अशी पाखरे येती...*
ःःःःःःःःःःःः🌹
* घार*
ःःःःःःःःःःःः🌹
आकाशात उडताना अधेमधे गटांगळ्या खाणे, ही विशेषता. गृहांगणाच्या (घरासमोरील अंगण) अगदी वर आकाशात भ्रमण करीत राहणे अथवा घराभोवती घिरट्या घालणे, ही वैशिष्ट्य. कुठे खाद्यवस्तू दिसताच तीव्रतेने त्यावर झेप घेऊन डोळ्यांची पापणी लवते न लवते एवढ्या चपळतेने ती वस्तू उचलून नेणे, ही खासियत. ही सर्व गुणवर्णने आहेत घार या पक्ष्याची. उभ्या माणसाच्या हातातील वस्तू अलगदपणे उचलून पळविणे हा घारीच्या डाव्या हाताचा (?) मळ आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. अशावेळी घारीच्या झडपेने माणसाचा हात जखमीही होऊन जातो. पण त्याची पर्वा या घारीला कसली? असे म्हटले जाते की, खाद्यपदार्थाशिवाय माणसाच्या हातातील कोठल्याही वस्तूचे तसेच स्त्रियांच्या हातातील दागदागिन्यांचे घारीला जबरदस्त आकर्षण असते. मोठ्या शिताफीने ती अशा वस्तूंचे अपहरण करते. बाजारातील मांस-मासोळीच्या दुकानांभोवती या घारीचं विशेषत्वानं वास्तव्य राहते. परिसरातील या भागात ती सतत घिरट्या घालत असते. मासोळी घारीचं आवडतं खाद्य असून ते उचलून नेण्यात घारीचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे. गरुडाप्रमाणे घारसुद्धा लहान मुलांचं अपहरण करते. उंदरासारख्या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवते. घारीची नजर तीक्ष्ण असते. हजारो मैल उंचावरून जमिनीवरील, शेतातील उंदीर वगैरे प्राणी ती पाहू शकते. सावज तिला दिसताच तेवढ्याच चपळतेने सावजाला आपल्या पंखात दाबून झाडावर बसताक्षणीच गटकूनही टाकते. घार आपल्या चोचीने कधीही शिकार करीत नाही. याच एका कारणामुळे आपले सावज घेऊन उडत जात असताना कावळा नजर ठेवून असतो व आयत्या बिळावर नागोबा बनून तो ते सावज हिसकण्याचा प्रयत्न करीत असतो. अशावेळी घार व कावळा असे आकाशयुद्धही छेडले जाते. घार उडताना आपले पंख इतके विस्तारित करीत उडते की जणू काही एखादे विमानच उडत आहे की काय, असा भास आपल्याला होतो.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹
प्रदीपजी, काही करा की
ReplyDelete